विरार : वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष सुविध पवार यांच्या प्रयत्नातून पालघर जिल्ह्यातील मुस्लिम युवक फिरोज शेख, अब्दुल अरीम खान आणि नासिर शेख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमास पालघर जिल्हा प्रभारी सुप्रेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र महासचिव मिलिंद सोमा कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिका उपाध्यक्षा प्रेरणा भेकरे, विरार शहर अध्यक्ष अभिजित खैरे, महिला आघाडी अध्यक्षा सारिका सकपाळ, विरार शहर कमिटी पदाधिकारी, अर्चनाताई तांबे आदी उपस्थित होते.
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुप्रेश खैरे आणि सुविध पवार यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी मिलिंद सोमा कांबळे यांनी पक्षाची ध्येयधोरणे, सामाजिक दिशा आणि भावी भूमिका नव्या सदस्यांना समजावून सांगितली. नव्या युवा नेतृत्वाच्या प्रवेशामुळे वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटन रचना अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.





