नांदेड महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या राजश्री राक्षसमारे विजयी
नांदेड : कुठल्याही राजकीय घराण्याचा वारसा नसताना, सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याच्या संघर्षाला न्याय देत वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये नवा राजकीय इतिहास घडवला आहे. कुलदीप राक्षसमारे यांच्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या पत्नी राजश्री राक्षसमारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
कुलदीप राक्षसमारे हे जयभीम नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहेत. त्यांच्या आई बारदाना शिवण्याचे काम करतात, तर वडील रिक्षा चालक आहेत. स्वतः बॅनर लावण्याचे काम करून दररोज तीनशे ते चारशे रुपयांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणाने कठीण परिस्थितीतही आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही.
वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेतल्यानंतर त्यांनी बालसैनिक घडवणे, आंदोलनं, मोर्चे तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता काम केले. या प्रवासात त्यांना धमक्या, दबाव आणि अडचणींचा सामना करावा लागला, मात्र ते कधीही मागे हटले नाहीत. नांदेड जिल्ह्यात आई रमाई जयंती सर्वात आधी काढण्याचा पुढाकारही त्यांनी घेतला होता.
बाळासाहेब आंबेडकर नांदेड दौऱ्यावर येणार असतील, तर शहर सजवण्याची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः घेत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या सर्व संघर्षाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने पद, पैसा किंवा ओळख न पाहता राजश्री राक्षसमारे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या निवडीकडे केवळ एका उमेदवाराचा विजय म्हणून न पाहता, एका सामान्य कार्यकर्त्याच्या संघर्ष, निष्ठा आणि प्रामाणिकपणाला मिळालेली पावती म्हणून पाहिले जात आहे.
ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीमध्ये संघर्षाला किंमत आणि कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, याचे उदाहरण असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.





