लोणावळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या विटंबने विरोधात निषेध
वडगाव : वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ यांनी केले. वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष संदीप कदम आणि वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्षा मनीषाताई ओव्हाळ यांच्या नियोजनातून या मोर्चाचे आयोजन झाले. मोर्चात मावळ तालुक्यातील विविध पक्षनिष्ठ नागरिक, महिला, युवा, कामगार व आंबेडकरी चळवळीतील संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या :
1. 14 ऑगस्ट रोजी लोणावळा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर त्वरित अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. सतत होणाऱ्या पुतळा विटंबनामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रकार घडत असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
2. जनसुरक्षारक्षक कायदा रद्द करावा.हा कायदा लोकशाहीस धक्का देणारा असून सामान्य जनतेचे हक्क हिरावून घेणारा आहे.
3. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. मे महिन्यापासून पडलेल्या संततधार पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
4. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात. ऑनलाइन अर्ज प्रणालीमुळे ग्रामीण व शेतकरी वर्ग वंचित राहतो. शासनाने सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून द्यावा.
5. मावळ तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, समाज मंदिरांना निधी, स्मार्ट मीटरमुळे वाढलेली विजेची बिले, दलित सुधार वस्ती निधीचा पारदर्शक वापर आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी पुणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा जयश्रीताई सदावर्ते, लोणावळा शहराध्यक्ष लोकेश भडकवाड व कमिटी, तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई व त्यांची कमिटी, माथाडी कामगार अध्यक्ष संजय कुलकर्णी, कामशेत शहराध्यक्ष महेश परमार, युवा नेते करण भालेराव (लोणावळा), प्रमोद खंडारे (वडगाव), सागर शिंदे (पवन मावळ),
महिला आघाडीच्या संध्या गायकवाड, संगीता अवचर, वैशाली गायकवाड, तेजस्विनी चव्हाण, प्रकाश गायकवाड, बाळकृष्ण टपले, लहू लोखंडे, ज्ञानदेव ससाने, अक्षय साळवे, सुनील वाघमारे, संजय शिंदे, पोपट वंजारी, कैलास साबळे, प्रवीण गायकवाड, संजय कांबळे, रोहन कांबळे, प्रिया शिंदे, अश्विनी बनसोडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.