जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पक्षाने फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पारलिंगी कार्यकर्ती शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय केवळ फैजपूरसाठीच नव्हे, तर राज्यातील पारलिंगी समाजाच्या राजकीय समावेशनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
शमिभा पाटील या फैजपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 9 ब मधून नगरसेविका म्हणून निवडणूक लढवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ‘जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी’ या उद्देशाने त्यांनी ही उमेदवारी दिली आहे. यातून वंचित बहुजन आघाडीने समाजात दुर्लक्षित असलेल्या ‘वंचित’ घटकांना राजकीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
शमिभा पाटील यांची पार्श्वभूमी –
शमिभा पाटील या केवळ राजकीय उमेदवार नसून, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर पदवीधर (Postgraduate) आहेत आणि २००७ पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
विशेष म्हणजे त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये अतिथी प्राध्यापिका (Guest Faculty) म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी रावेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मानवी हक्कांसाठी त्या लढत आहेत आणि राजकीय पक्ष नेहमीच दुर्लक्ष करत असलेल्या ‘वंचित’ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीने शमिभा पाटील यांना तिकीट देऊन केवळ पारलिंगी व्यक्तीला संधी दिली नाही, तर समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी पक्ष कार्यरत असल्याचे दाखवून दिले आहे.





