नागपूर : खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत 11 वर्षाच्या निरपराध जीत युगराज सोनेकर या सहावीतील विद्यार्थ्याची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या भयानक घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली खापरखेडा पोलीस स्टेशन येथे धडक देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
घटनेचा तपशील :
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शाळा सुटल्यावर जीत युगराज सोनेकर या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे आरोपी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा यांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र पोलिसांची चौकशी सुरू झाल्याने कट फसला आणि आपले नाव उघडकीस येईल या भीतीने या नराधमांनी निर्दयपणे जीतची हत्या करून दोन दिवस मृतदेह बोरीत डांबून ठेवला. त्यानंतर चनकापूर शिवारात मृतदेह टाकण्यात आला.
या घटनेने खापरखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की त्यांची मुले शाळेतून सुखरूप परत येतील की नाही.
“काय दोष होता त्या जीतचा? का त्याला मारले गेले? या घटना थांबणार आहेत की नाही?” असे प्रश्न समाजमनात आज निर्माण झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या –
या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे राज्य सरकारसमोर ठोस मागण्या मांडल्या आहेत –
- 1. जीत युगराज सोनेकर हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
- 2. अल्पवयीन विद्यार्थ्याची क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
- 3. खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गस्त वाढवावी आणि शाळा परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवावा.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वैभव येवले, शुभम वाहने, श्याम गजभिये, नरोत्तम मडकवार, भगवान गजभिये, आनंद बागडे, कमलेश सहारे, शैलेश पाटील, सुनील वाहने, कैलास सुवाडोर, अशोक वासनिक, मिथुन सहारे, मुन्ना मेश्राम, सिद्धार्थ दांडगे, कुंडलिक सहारे, सिद्धार्थ शेंडे आदींचा समावेश होता.
या भयंकर घटनेविरोधात जनतेत प्रचंड संताप असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अन्यथा जनतेचा आक्रोश उफाळून येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.