औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत नागरी सुविधांची उपलब्धता आणि सामान्य जनतेचे जिवंत प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. औरंगाबादच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे प्रश्न महापालिकेत मांडण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा.”

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनीही यावेळी आपले विचार मांडले. त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि नागरी समस्यांवर बोट ठेवत, वंचित बहुजन आघाडी हाच सर्वसामान्यांसाठी एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.






