डॉ. संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या स्त्रीविरोधी विधानाचा तीव्र निषेध; वंचितच्या महिलांचा संताप उफाळला!
मुंबई : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेले विधान हे स्त्रीविरोधी, अमानवी आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केले. पीडित स्त्रीलाच दोष देणाऱ्या आयोगाला महिला आयोग म्हणायचं की मनुवादी आयोग? असा सवाल महिलांनी उपस्थित करत घोषणाबाजी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने मुंबईत उतरल्या होत्या. रुपाली चाकणकर राजीनामा द्या, अशा घोषणा देत वंचित बहुजन महिला आघाडीने न्यायाची मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीतर्फे चैत्यभूमी येथे ‘महापरिनिर्वाण दिना’साठी स्वयंसेवक नोंदणी आवाहन
पण, या न्यायाच्या आवाजावर पुन्हा एकदा पोलिसांच्या लाठ्यांचा मारा झाला. निषेध मोर्चा सुरू असतानाच आंदोलक महिलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. महिलांना जबरदस्तीने फरफटत नेण्यात आले, काहींना मारहाण झाली. या घटनेत अनेक महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.
वंचित बहुजन आघाडीने पोलिसांच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या महिलांवर हात उचलणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही. न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहील. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर अन्याय करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला लोकशाहीच्या मार्गाने चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.






