अमरावती : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील आशा वर्कर कामिनीताई कांबळे यांचे मानधन गेल्या तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक रोखण्यात आले. या अन्यायाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनात हे आंदोलन पार पडले.
कामिनीताई कांबळे या ग्रामपंचायत सदस्य होत्या. मात्र त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही ग्रामपंचायतीकडून कुठलेही मानधन स्वीकारले नाही. तरीसुद्धा विविध नियमांचा दाखला देत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने त्यांचे आशा वर्कर म्हणून मिळणारे मानधन रोखून ठेवले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अन्याय होत असल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात आले.
या आंदोलनादरम्यान जिल्हा महासचिव सागर भवते यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “मागासवर्गीय समाजातील आशा वर्करवर अन्याय होत असून, आरोग्य विभागातील जातीयवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात कामिनी कांबळे, मुकेश कांबळे, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे, महासचिव अमोल जवंजाळ, अनिल सोनोने, पवन थोरात, सागर गोपाळे, विनोद खाकसे, नितीन थोरात, भारत दहाट, दिपक थोरात, चंदा थोरात, सुचिता थोरात, ममता आठवले, मनीषा कांबळे, शशिकला तायडे, माधुरी थोरात, ललिता मोहोड यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.