अकोला – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीत सामील होण्यासंदर्भात सकारात्मक पत्र पाठवण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणते अधिकृत उत्तर आलेले नाही. वंचित बहुजन आघाडी आणि इंडिया आघाडीच्या युतीसंदर्भात बोलतना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की , ” १ सप्टेंबर रोजी आम्ही मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहलं आहे. या पत्राला त्यांनी उत्तर द्यायला हवं होत. मात्र त्यांनी अजूनही उत्तर दिलेलं नाही. तुम्ही आम्हाला युतीमध्ये घेणार की नाही घेणार? हा प्रश्न आम्ही लोकांमध्ये विचारु, लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. यातून युती होईल किंवा नाही होणार हे स्पष्ट होईल. यातून वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत युती करत नाही हा लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल.”
शेतीमालाला बाजारभाव मिळायला पाहिजे. प्रतिनिधित्वाचा प्रश्न आणि ओबीसी जनगणनेच्या प्रश्न महत्वाचा आहे. असेही यावेळी सुजात आंबेडकरांनी म्हटले आहे.
अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे उपस्थितीत ओबीसी संवाद बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती.