उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीने ऑक्सिजन बेड ग्रामीण जनतेला मिळावे यासाठी एक कोटी रुपयांची तरतुद केली आहे. जिल्हयात एकुण 42 प्राथमिक आरोग्य केंद्र (PMCs) असुन प्रत्येकी 10 बेड देण्याची व्यवस्था केली आहे, याची टेंडर प्रक्रीया पुर्ण झाली आहे. मात्र सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देखील अध्यापही अंमलबजावणी झाली नाहीये, याचा मुहूर्त कधी लागणार ?
तसे पाहता जिल्हातील लोकसंख्याच्या तुलनेने हे एक कोटीचे बजेट अत्यअल्प व तुटपुंजे आहे. प्रत्यक्षात पहायचे झाले तर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, अपुरी अत्यावश्यक साधने इत्यादी. सद्यपरिस्थितीत इतका प्रचंड ताण असताना यंञणा व्यवस्थीत चालवण्यासाठी तज्ञ मंडळी लागतात त्यांची प्रचंड वानवा. अारोग्य यंत्रणेवर प्रंचड ताण आलेला आहे आणि लसिकरण देखील अर्धवट अवस्थेत आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांसाठीदेखील रुग्णांना प्रचंड झगडावे लागत आहे. सर्वसामान्य जनता मनातील असुरक्षिततेमुळे जीव मुठीत घेऊन जगत आहे – दुसरा पर्याय नाही, करणार तरी काय ?
उदाहरणच घ्यायचे झाल्यास भुम तालुक्यातील आंबी या माझ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एकही ऑक्सीजन बेड नाही, व्हेंटिलेटर तर दुरचीच गोष्ट. इथे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि तज्ञ देखील नाहीत. करोना चाचणी होते आणि पॉसिटीव्ह आढळल्यास रुग्णाला उपचारासाठी ईतर ठिकाणी पाठवावे लागते. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांची इतक्या मोठ्या प्रमाणावर वानवा असणे ही दुर्दवी बाब आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची देशभर चर्चा होत असताना अामच्याकडे माञ मूलभुत आरोग्य गरजांसाठी अजुनही मारामारच. अशा निरोपयोगी आणि नावपूरत्या आरोग्य केंद्राचा उपयोग काय ? हा खोटा दिलासा जीवघेणा नाहीये का ?
या प्राथमिक केंद्रा अंतर्गत 10-12 खेडी येतात. म्हणजेच साधारण 10 ते15 हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्रावर अवलंबुन आहे. लोक तपासणीसाठी याठिकाणी येत असतात. पण वेळप्रसंगी गरज भासल्यास एकही अँम्बुलन्स येथे नाही. बऱ्याचदा सुविधा नसल्याने रुग्णाला शेजारच्या जिल्हयात हलवावे लागते, नाहीतर कधी कधी उपचाराअभवी रुग्ण दगावतात देखील.
राजकारण्यांची उदासीनता खेदजनक….
ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर बरोबरच कोविड सेंटर उभारणे ही खरी गरज आहे. पण करणार तरी काय आणि कोण ? सगळेच हतबल आहेत कारण हा ताई,दादा,भाउ,तात्या,साहेब,अण्णा यांचा मतदारसंघ नाही ना ! अडगळीत पडलेल्या मतदारसंघाचा कोणाला फायदा ना तोटा. जिल्हातील प्रशासनाचे व राजकीय मंडळीचे सपसेल दुर्लक्ष…लोक मेले काय आणि जगले काय कोणाला घेणेदेणे दिसत नाही… देशभरात उस्मानाबाद येथील ऑक्सीजन प्रकल्पाचे कौतुक जरी होत असले तरी खरी वास्तविकता वेगळी आहे….हे झालंय असं की ऑक्सिजन प्रकल्प उशाला तरी कोरड माञ जिल्हयालाच नव्हे तर मराठवाडयातील जनतेच्या घशाला…!!
कुलदीप आंबेकर