गडचिरोली: माता रमाबाई आंबेडकर यांना स्वत:च्या संसारापेक्षा करोडो दिन दलीत लोकांच्या संसाराची चिंता होती, चार-चार पोटच्या लेकरांचे बलिदान दिले, अनेक प्रकारच्या मरणयातना भोगल्या, गरिबीचे चटके सोसले परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्येच्या भूकेत खंड पडू दिला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला नाही या रमाईच्या त्यागातूनच निर्माण झालेल्या सामाजिक क्रांतीला अधिक गतीमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी आंबोली येथील रमाई जयंती महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
बौद्ध समाज मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात रमाई जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नामदेव मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संदिप बेलखेडे, अशोक उंदिरवाडे, जयाप्रदा रामटेके, करिश्मा गोडबोले आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना टेंभुर्णे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत तर रमाबाई या आमच्या आई आहेत यांनी निर्माण केलेलं राजगृह हेच आमच्या सामाजिक, धार्मिक, राजकिय चळवळीचे माहेरघर आहे त्यालाच केंद्रबिंदू मानणारे कार्यकर्तेच चळवळ जीवंत ठेऊ शकतात असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा समयोचीत भाषण करून रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक रविंद्र काटकर यांनी तर आभार शारदा चुनारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाखा चुनारकर, तेजाबाई उंदिरवाडे, ललिता मेश्राम, कैलास दुर्गे, भास्कर रामटेके यांनी परिश्रम घेतले.