नंदूरबार : नंदूरबार शहरात एका आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या तणावाचे रूपांतर आता हिंसक आंदोलनात झाले आहे. या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हजारो आदिवासी बांधव आणि विविध आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. तसेच काही प्रमाणात दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापटीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुमारे वीस ते बावीस हजार आंदोलक या मागणीसाठी एकत्र आले होते, अशी माहिती मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक या दोघांनाही या हिंसक घटनेत इजा झाली आहे.आदिवासी संघटनांनी, तरुणाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे.