किनवट : वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची नांदेड, किनवट येथे जाहीर सभा नुकतीच पार पडली. ‘किनवट पॅटर्न’च्या माध्यमातून वंचित समूहांना सत्तेत घेऊन जाण्याचे आवाहन करत, बहुजन समाजाने स्वतः निवडून आपले प्रश्न सोडवावेत, असे मार्गदर्शन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.

ऐतिहासिक ‘किनवट पॅटर्न’ची आठवण –
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी राबवलेल्या ऐतिहासिक ‘किनवट पॅटर्न’ची आठवण करून दिली. या पॅटर्नच्या माध्यमातून वंचित समूहांना सत्तेत घेऊन जाण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला होता.

किनवटच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव सक्षम पर्याय असल्याचे सुजात आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले. वंचित समूह, कार्यकर्ते आणि नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. बहुजन समाजाने स्वतःच्या मताने निवडून सत्तेत पोहोचून आपले प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सुजात आंबेडकरांच्या आवाहनानंतर, उपस्थित जनसमुदायाने ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करत त्यांना प्रतिसाद दिला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद आणि राज्य सदस्य अविनाश भोसीकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. याप्रसंगी नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





