उल्हासनगरमध्ये सभेला मोठा प्रतिसाद!
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीकडून होणाऱ्या जाहीर सभेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. यावेळी सुभाष टेकडी परिसरात नागरिकांचा अथांग जनसागर उसळला होता, ज्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

भ्रष्टाचाऱ्यांचा सुफडा साफ करण्याची वेळ आली आहे!
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरची आणि विशेषतः सुभाष टेकडीची अवस्था दयनीय आहे. येथील विकास निधी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातला आणि जनतेला वाऱ्यावर सोडले. ज्यांनी उल्हासनगरची तिजोरी लुटली, त्यांना आता सत्तेच्या बाहेर फेकण्याची वेळ आली आहे.”

वंचितांचा जाहीरनामा: ‘केजी टू पीजी’ मोफत शिक्षणाचे आश्वासन
सुजात आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवत वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास कोणत्या सुधारणा होतील, ते यावेळी सांगण्यात आले.
– प्रत्येक घराला २४ तास स्वच्छ पाणी आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण.
– भुयारी गटार योजना राबवून डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून मुक्ती.
– पालिकेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधांसह मोफत दर्जेदार इंग्रजी शिक्षण. ‘केजी ते पीजी’ (KG to PG) मोफत शिक्षणाची संकल्पना उल्हासनगरमधून राबवणार.
– घरकुल घोटाळ्याची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणार.
नकली आंबेडकरवाद्यांपासून सावध राहा –
विरोधकांवर टीकास्त्र करताना ते म्हणाले, आज काही लोक बाबासाहेबांचे नाव घेतात, पण त्यांची पाकिटे ‘कमळाबाई’च्या घरून येतात. असे नकली आंबेडकरवादी तुमची दिशाभूल करतील, त्यांच्यापासून सावध राहा. ही निवडणूक तुमच्या हक्काची आहे, तुमच्या भविष्याची आहे.

निवडणुकीत चालणाऱ्या पैशाच्या राजकारणावर सुजात आंबेडकरांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले. ५०० रुपयांत मत विकणे म्हणजे दिवसाला फक्त ३५ पैशात स्वतःचे भविष्य विकण्यासारखे आहे. एका बाजूला सत्तेसाठी ५० खोके घेणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला १ कोटींची लाच धुडकावून लावून सत्यासाठी लढणाऱ्या विजयाबाई सूर्यवंशी यांचा आदर्श आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाच्या पाठीशी उभं राहायचंय, असे आवाहन त्यांनी केले.

सभेला परवानगी नाकारण्याचे किंवा अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले, असेही सुजात आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले की, वंचित बहुजन आघाडीची सभा रोखण्याची ताकद महाराष्ट्रात कोणाकडेही नाही. हा आमचा बालेकिल्ला आहे आणि येथील जनताच आता उत्तर देईल.

या सभेत वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक उमेदवार, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सभेनंतर उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.






