नांदेड : नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार रॅलीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली ही रॅली प्रभाग क्रमांक 19, वसरणी येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी जनतेशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि सर्वसमावेशक राजकारणावर भर दिला. युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

घोषणाबाजी, फलक, झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युतीला पाठिंबा देण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.

या रॅलीमुळे नांदेडच्या राजकीय समीकरणांमध्ये हालचाल निर्माण झाली असून, निवडणुकीत ही युती निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.






