अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – २०२५), वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अकोला तालुक्यात ‘चर्चा दौरा’ करत कार्यकर्त्यांना ‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ होऊन काम करा, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत बहुजन, दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील उमेदवारांना बहुसंख्येने उभे करण्याची पक्षाची योजना त्यांनी स्पष्ट केली.
दौऱ्यादरम्यान, सुजात आंबेडकर यांनी अकोल्यातील प्रलंबित समस्यांवरून विद्यमान लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. “गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ज्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले, त्यांनी अकोल्याकडे का दुर्लक्ष केले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
वंचित बहुजन समाजावर सतत टीका होते, मात्र येथील प्रस्थापित नेत्यांना मूलभूत प्रश्न विचारण्याची हिंमत का दाखवली जात नाही, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. पाणी, वीज, आरोग्य आणि शेती यांसारखे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आमदार आणि खासदार काम करत नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनाही काम करताना अडचणी येणार, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांना ‘बाळासाहेब आंबेडकर’ होण्याची प्रेरणा :
स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, असे सांगत सुजात आंबेडकर यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले. “आता प्रत्येकाने ‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ या भूमिकेतून काम करावे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारल्याचे दिसून आले.