अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे. अकोल्यात सायंकाळी ६:३० वाजता प्रभाग क्रमांक ३ मधील पंचशील नगर (खरप) येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पंचशील नगर (खरप) येथे वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. नगरपरिषदेच्या यशानंतर आता महानगरपालिकेतही विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सुजात आंबेडकर स्वतः मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला.

प्रचारादरम्यान सुजात आंबेडकर यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “भाजपने महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून, प्रशासकाच्या माध्यमातून अकोल्याला लुटण्याचे काम केले आहे. आता वेळ आली आहे या भ्रष्टाचारी व्यवस्थेला उत्तर देण्याची. अकोल्याचा सर्वांगीण विकास केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते.”
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, कुठल्याही परिस्थितीत विजय संपादन करण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा.

‘वंचित’चा बालेकिल्ला राखण्यासाठी सज्जता
अकोला हा नेहमीच वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत पक्षाने मारलेली मुसंडी पाहता, आता महानगरपालिकेतही सत्ता काबीज करण्यासाठी पक्ष अधिक आक्रमक झाला आहे. सुजात आंबेडकरांच्या या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती
वंचित बहुजन युवा आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव, युवा आघाडी), श्रीकांत घोगरे (जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी), निलेश देव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरली आहे. सुजात आंबेडकरांच्या सक्रियतेमुळे उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, ‘वंचित’ आपले वर्चस्व कायम राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






