वर्धा : क्रिकेट विश्वचषक-२०२३ चा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी आज वर्धा येथे होणारी होणारी शिक्षण हक्क परिषद रद्द केली आहे.
मागील 15 दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या परिषदेची तयारी चालविली होती. त्यावेळी भारत वर्ल्डकप अंतिम सामन्यात पोहचेल का? ह्याचा अंदाज कोणालाच नव्हता. पण, आता भारत – ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होणार आहे आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळात सामना रंगात आलेला असेल. याच दरम्यान परिषदेची वेळ होती.
भारतीय लोकांचं क्रिकेट प्रेम लक्षात घेऊन युवकांना अंतिम सामन्याचा जोश अनुभवता यावा, यासाठी ही परिषद पुढे काही कालावधीनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2011 नंतर भारताला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्या या निर्णयाचा तरुणांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.
सुजात आंबेडकरही क्रिकेटप्रेमी असून त्यांचे या मॅचकडे लक्ष आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी शक्य तिथे LED ची व्यवस्था करून सामूहिकरित्या खेळाचा आनंद घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केले.