रशिया : रशियाच्या पूर्वेकडील कमचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
हा भूकंप पहाटे २.३७ वाजता आला, ज्याचे केंद्रबिंदू कमचटका शहरापासून सुमारे १११ किलोमीटर पूर्वेकडे उत्तर पॅसिफिक महासागरात होते. या घटनेनंतर पॅसिफिक महासागरातील त्सुनामी धोक्याच्या शक्यतेवर अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. जुलै महिन्यामध्ये याच भागात ८.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला होता, त्यामुळे प्रशासनाने यावेळी विशेष खबरदारी घेतली आहे.
कमचटका प्रदेशात मोठ्या भूकंपांचा इतिहास आहे. जुलैमध्ये आलेला ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप गेल्या १४ वर्षांतील जगातील सर्वात शक्तिशाली आणि आतापर्यंतचा सहावा सर्वात मोठा भूकंप होता. जपानमधील २०११ च्या ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या तुलनेत हा धक्का कमी असला तरी तो अत्यंत शक्तिशाली होता. यापूर्वी १९५२ मध्येही या भागात ९.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, जो इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक आहे.
अलीकडेच अफगाणिस्तानमध्येही ६.० रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठा विध्वंस घडवला. जरी त्याची तीव्रता कमी असली तरी त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, या भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहरापासून पूर्वेकडे २७ किलोमीटर अंतरावर होते. यामुळे भूकंपाची तीव्रता कमी असूनही जीवितहानी होऊ शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.