सोलापूर : गेल्या 24 तासांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या पावसाने शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण केली असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 118.3 मिमी पावसाची नोंद झाल्याने अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि शहराच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
या विक्रमी पावसामुळे सोलापूरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रात्रभर पाण्याचा सामना करत नागरिकांना घरातील वस्तू वाचवण्यासाठी झगडावे लागले. शहरातील विडी घरकुल, दहिटणे, शेळगी आणि अक्कलकोट रोड परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
या जलप्रलयाचा फटका दळणवळणालाही बसला आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील जुना तुळजापूर नाका येथील नाला ओसंडून वाहत असल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मराठवाडा आणि दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.