पुणे : ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रुजविण्यासाठी अहोरात्र झटणारे, घरोघरी संविधान पोहोचवण्याचा संकल्प करणारे कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक समता व बंधुतेचा जागर करणाऱ्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हमाल भवन येथे जनसागर लोटला होता.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पुणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कष्टकरी, असंघटित कामगार आणि सामाजिक चळवळींमध्ये शोककळा पसरली आहे.
हमाल भवनवर जनसागराची गर्दी
नेहमीच कष्टकऱ्यांच्या आवाजांनी गजबजणारे मार्केट यार्ड येथील हमाल भवन मंगळवारी दुःखात अखंड बुडाले होते. मार्केट यार्ड येथील दुकाने पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हमाल भवन येथे आणण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. तसेच अधिकारी, कामगार, व्यापारी, महिला असे सर्व स्तरातील नागरिकांनी देखील बाबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी पाच वाजता त्यांना पोलिसांचा ताफा मानवंदना देण्यासाठी हमाल भवनात पोहोचला आणि त्यांनी बाबा आढाव यांना सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा संपूर्ण दिवस “जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!”, “अमर रहे अमर रहे बाबा तेरा नाम अमर रहे”, आणि “सत्य की जय हो” च्या घोषणांनी दणाणून गेला होता. डॉ. बाबा आढाव यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.






