सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील शेतकरी नागनाथ शिवाजी मदने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते शरद कोळी याच्यावर शेती बळकावण्याचा गंभीर आरोप केला आहे. या अन्यायाविरोधात नागनाथ मदने यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मदने यांनी धमकवल्या नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वडिलोपार्जित शेती त्यांनी अनेक वर्षांपासून कसत असून सर्व शेती कर नियमित भरला आहे. तथापि, गेल्या तीन महिन्यांपासून शरद कोळी यांनी त्यांची शेती बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
“आम्ही घरी नसताना आमच्या शेतातील चालू पिके – कांदा, मिरची व मका – नांगरून टाकण्यात आली. त्यामुळे आम्हाला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय आमच्या शेतातील पाण्याची बोअरवेल तोडण्यात आली आणि एक शेळी मारण्यात आली,” असा गंभीर आरोप मदने यांनी केला आहे.
मदने यांनी पुढे सांगितले की, “शरद कोळी आम्हाला वारंवार धमक्या देतात. ‘शेती मी विकत घेतली आहे, घरे नाही काढली तर जिवंत ठेवणार नाही’ असे कोळी उघडपणे म्हणतात. एवढेच नव्हे तर आम्ही कामती पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यायला गेलो असता, त्यांनी ‘तुम्हाला गाडीखाली टाकीन, जिवंत ठेवणार नाही’ अशा प्रकारे धमक्याही दिल्या.”
ऐरोलीत जातीय मानसिकतेतून बौद्ध तरुणावर अत्याचार; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली पीडितांची भेट
मदने यांचा आरोप आहे की, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलीस कर्मचारी तक्रार दाखल करून घेत नाहीत, उलट “तुमच्यावरच गुन्हा दाखल होईल” अशी भीती दाखवतात आणि दोघांनाही बाहेर पाठवून देतात.
या अन्यायाविरोधात नागनाथ मदने यांनी ठाम भूमिका घेतली असून त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे
आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.






