पुणे : शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गुरुवारी (२४ जुलै) मध्यरात्री हडपसरमधील फुरसुंगी परिसरात एका टोळक्याने कोयते व दांडक्यांच्या साहाय्याने अनेक वाहनांची तोडफोड करत परिसरात खळबळ उडवली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अॅरो विहार आणि त्रिवेणीनगर परिसरात येऊन रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारी आणि दुचाकींची तोडफोड केली. शिवीगाळ करत त्यांनी नागरिकांमध्ये दहशत पसरवली. पोलीस हवालदार बोबडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याआधी धनकवडी, विश्रांतवाडी, कोंढवा, भवानी पेठ, औंध आणि सिंहगड रोड परिसरातही अशाच प्रकारच्या वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
धनकवडीतील प्रकरणात, ‘आम्ही धनकवडीचे भाई आहोत’ अशी घोषणा देत टोळक्याने १५ रिक्षा, दोन मोटारी आणि एका व्हॅनची तोडफोड केली होती. या प्रकरणात अवघ्या २४ तासांत पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी रोहित आढाव, सुधीर सावंत आणि तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतलं. तपासात ही घटना वाढदिवसावरून झालेल्या रागातून घडल्याचं समोर आलं.
शहरात किरकोळ वादातून दहशत माजवण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अधिक तत्पर आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.