छ.शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी सुरु!
मुंबई – वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. मुंबईतील छ. शिवाजी महाराज मैदान, दादर मुंबई येथे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वा. ही महासभा होणार असल्याची माहिती पक्षाकडून समाज माध्यमांवर देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तर त्यानंतर धुळे, सटाणा या ठिकाणी आदिवासी हक्क परिषद मोठ्या संख्येने पार पडल्या होत्या आणि अशातच आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील छ. शिवाजी महाराज मैदानावर ही महासभा होणार आहे. या सभेत काय घोषणा होते? अॅड. प्रकाश आंबेडकर काय बोलतात? याकडे सर्व जाणकारांचे लक्ष लागून आहे.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ह्या सभेला अत्यंत महत्त्व आहे. देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असतांना महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित महासभेकडे जनतेचे लक्ष आहे. या सभेसाठी कोण कोण मान्यवर उपस्थित राहतात याकडेही लक्ष लागून आहे.
मुंबईभरातून मोठ्या प्रमाणात ह्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संविधान प्रेमी जनतेकडून प्रचार जोरात सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. तसेच ही महासभा देशातील संविधान प्रेमी जनतेला एक नवीन दिशा देणार असल्याची खात्री ही त्यांनी व्यक्त केली.