सांगली : “भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करूनच समताधिष्ठित समाज उभारता येईल,” असे मत समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. एस. के. भंडारे यांनी व्यक्त केले.
पलूस येथे 1 ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या पहिल्या महिला युनिट कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ह्या कॅम्पसाठी मुंबई, रत्नागिरी, सातारा, धाराशिव, जालना, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यांतील महिला सैनिक विशेष चाचणीद्वारे निवडून सहभागी झाल्या आहेत.
भंडारे यांनी अनुच्छेद 14 ते 30 पर्यंत दिलेले मूलभूत हक्क, तसेच अनुच्छेद 32 व 226 नुसार नागरिकांना न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच अनुच्छेद 51(क) नुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये अधोरेखित करून राष्ट्रध्वज-राष्ट्रगीताचा आदर, देशरक्षण, स्त्रियांच्या प्रतिष्ठेत उणेपणा आणणाऱ्या प्रथा टाकून देणे इत्यादी जबाबदाऱ्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत असे सांगितले.
या प्रसंगी पंचशील करिअर ॲकडमीचे हिम्मतराव ओहाळ व कल्पना ओहाळ, लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले, मेजर जनरल मोहन सावंत, ॲड. वंदनाताई सावंत, मेजर रुपेश तांमगावकर, रविंद्र लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला सैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाआधी आष्टा येथे व तासगाव येथे ॲड. भंडारे यांचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या ट्रस्टीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच सुधा फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, भवनाला कपाट व समाजासाठी खुर्च्या दान देणाऱ्यांचा सन्मान असे उपक्रम पार पडले. तासगाव येथे आयोजित कार्यक्रमात भंडारे यांनी सांगली जिल्हा महाविहार (विपश्यना केंद्र) प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले आणि “दुःखमुक्तीचा मार्ग” या विषयावर प्रबोधन केले.