चौथ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
– संपत देसाई
संशोधनाच्या क्षेत्रात काम करून नाव लौकिक मिळविणारे अनेक संशोधक आपण पाहतो. त्यांची त्यांच्या कामावरही खूप निष्ठा असते. परिश्रमक पूर्वक अभ्यास आणि चिंतानाच्या आधारे ते त्या त्या क्षेत्रातले तज्ञ म्हणूनही प्रसिध्द पावतात. त्यांच काम खूपच मोठं असतं पण प्रत्यक्ष परिवर्तनाशी ते जोडलेल जात नाही. कारण त्यांची समान्यांशी, त्यांच्या लढ्याशी अजिबातच नाळ नसते. डॉ गेल ओमव्हेट सारखे कांही मोजकेच विचारवंत संशोधक आहेत त्यांनी आपल्या तत्वज्ञानाला प्रत्यक्ष परिवर्तनाच्या लढ्याशी जोडलं आहे.
अमेरिकेत जन्मलेल्या गेल ऐन तारुण्यातच भारतातील सामाजिक चळवळींचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या. इथल्या चळवळींचा अभ्यास करता करता त्या इथल्या चळवळीचा भाग बनल्या. दलित, आदिवासी, कष्टकरी स्त्री पुरुषांच्या लढ्यात त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिल्या.
खरं तर गेल या मूळच्या संशोधक. समाजशास्त्राच्या अभ्यासक. आपल्या शोध प्रबंधासाठी त्यांनी *वासाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड* हा विषय निवडला. 1967 ते 1972 या काळात महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि ब्राम्हणेत्तर चळवळ हे त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र राहिले. त्यांच्या अभ्यासपूर्वी महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची दखल इथल्या ज्ञानाच्या क्षेत्रात फारशी घेतली जात नव्हती. महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची फेरमांडणी करत डॉ गेल यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना पहिल्यांदा केंद्रस्थानी आणले. महाराष्ट्राच्या विचारविश्वात गेल यांच्या मांडणीने प्रचंड उलथापालथ झाली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन आरपार बदलले. सत्यशोधक आणि ब्राम्हणेत्तर चळवळीची दखल इथल्या अभ्यासकाना डॉ गेल यांच्यामुळे घ्यावी लागली.
भारतातील स्त्रीवादाला नवा आयाम देण्याचे महत्वपूर्ण काम डॉ गेल यांनी केले. ग्रामीण कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न मांडत गेल यांनी स्त्री चळवळीला बहुजनवादी विचाराकडे आणले. उच्च जात वर्गाच्या परिघातच घुटमळलेली स्त्री मुक्तीची चळवळ तो परीघ तोडून बाहेर आली. आपल्या सासूबाई क्रांतीविरांगणा इंदूताई पाटणकर यांना सोबत घेत त्यांनी सांगली जिल्ह्याचा ग्रामीण भाग पायी चालत पिंजून काढला परित्यकत्या, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांना संघटित करीत त्यांचा लढा यशस्वी करून दाखवला. म्हणूनच गेल ह्या केवळ विचारवंत नव्हत्या तर त्या समाजबदलाच्या लढ्यातील कृतिशील करीकर्त्याही होत्या.
सर्व प्रकारच्या भेदाला नकार देणं ही त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती. म्हणूनच त्या धुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी स्त्री पुरुषांच्या मुक्ती लढ्यात पायाला भिंगरी बांधून ऊन वारा पावसाची तमा न बाळगता सहभागी झाल्या. भारतातील जातीव्यवस्था माणसाचे माणूसपण नाकारते. माणसाने राहावे कसे, जगावे कसे, कोणते काम करावे हे नियंत्रित करते हे पाहून त्यांना इथल्या जातीय शोषणाची तीव्रता दिसून आली. भारतीय समाज आमूलाग्र बदलायचा असेल तर तो वर्गीय, लैंगिक शोषणाबरोबर जातीय शोषणातून मुक्त झाल्याशिवाय बदलणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास. म्हणूनच त्यांनी मार्क्सच्या बरोबर इथल्या परंपरेतील विचारधारांची सांगड घालत नवी मांडणी केली. संत रविदास, कबीर यांच्यासह बहुजन समाजातील मराठी संतांच्या तत्वज्ञानाकडे इथल्या पुरोगामी चळवळीने कसे पाहावे याचे अनोखे दर्शन आपल्या मांडणीतून घडविले. फुले, आंबेडकरांच्या जत्यांतक तत्वज्ञानाला नव्याने अधोरेखित केले. इथल्या परिवर्तनवादी चळवळींना आपल्या संशोधनातून नवी उपलब्धी मिळवून दिली. यासाठी संशोधनाच्या क्षेत्रात प्रचंड मेहनत केली.
या दरम्यान त्यांनी पंचवीसहून अधिक संशोधनात्मक पुस्तकांचे लिखाण केले. त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रिव्हॉलट इन कोलोनियल इंडिया, नॉन ब्राम्हीण मूव्हमेंट इन इंडिया, सिक्कीम बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, दलित ऍड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशन यासह सॉंगज ऑफ तुकोबा ह्या पुस्तकांचा अंतरभाव आहे.
डॉ गेल यांनी भारतासह जगभरातील अनेक विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केले आहे. अनेक आतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये लिखाण केले आहे. हिंदू मधील त्यांचे लिखाण वाचून दक्षिण भारतातील हस्तिदंत तस्कर म्हणून ज्यांची दुर्दैवी ओळख आहे पण प्रत्यक्षात बहुजन सांस्कृतिकवादाचे कडवे समर्थक राहिलेल्या विरप्पन यांनी त्यांना पत्र लिहून अभिनंदन केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत एबीपी माझासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कराने त्यांना सन्मानित केले आहे.
अमेरिकेसारख्या कोणालाही भूरळ पडणाऱ्या वैभवशाली देशात वाढलेल्या गेल इथल्या मातीत रुजल्या त्या केवळ मानवतावादावर त्यांची असलेली अपार निष्ठा आणि तळातल्या माणसाशी असलेल्या बांधिलकीमुळेच. कासेगाव सारख्या छोट्या गावात राहून श्रमिक मुक्ती दलाच्या अनेक लढ्यात त्या नेहमी पुढाकारात राहिल्या. अलीकडे जातीय अत्याचाराच्या घडलेल्या घटनेने उद्विग्न झालेल्या गेल खर्डा परिषदेसाठी पायी चालत सहभागी झाल्या.
श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सभासद असलेल्या गेल यांनी श्रमिक मुक्ती दलासह अनेक पुरोगामी चळवळीना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा तात्त्विक मंडणीने अनेक चळवळीनी आपल्या रूढ धारणा सोडून स्वतःला बदलले आहे. अशा या थोर संशोधक, तत्त्वचिंतक असलेल्या विदुषी डॉ गेल या डॉ भारत पाटणकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या सोबत अंबाबाई मंदिर प्रवेशाच्या आंदोलनात अनेक आंदोलनात मी सहभागी झालो होतो. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांना विनम्र आदरांजली…!