खेड (रत्नागिरी) : महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त आयोजित पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील सध्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नुकतेच मंजूर करण्यात आलेले धार्मिक स्वातंत्र्य विधेयक हे जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच देशातील विविध प्रवाहांमध्ये मुस्लीम समाजाविषयी द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी ‘इस्लामोफोबिया’ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले. The Kerala Story सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून ‘हिंदू खतरे में है’ असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

देशातील धर्मांतराच्या आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दलित, बहुजन तसेच भटके-विमुक्त समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत आहेत.
धार्मिक स्वातंत्र्य विधेयकातील तरतुदींवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, धर्मांतर करण्यासाठी एक महिना आधी नोटीस देणे आणि जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. तसेच विवाहानंतर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व घडामोडी लोकशाहीसाठी धोकादायक असून, “ही परिस्थिती दहशतवादाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली.





