देशाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाढत्या धर्मांधतेचे परिणाम बघितले आहे. लोकशाही विकसित होऊ बघण्याच्या काळातदेखील ही धर्मांधता अधूनमधून आपलं मुंडकं वर काढतच होती. यामुळे अनेक दंगे उद्भवले. वित्त हानी, जीवितहानी झाली. परंतु, हे सर्व यावरच येऊन थांबले का? तर याचं नीटस मोजमाप आजवरच्या सत्ताधाऱ्यांना करता आलं नाही, बहुधा तसे करण्याची त्यांची इच्छाशक्ती देखील नसेल. त्याचमुळे ही धर्मांधता आजच्या तारखेपर्यंत आपण रोखू शकलो नाही. भारतीय संविधानाच्या उद्देशिका वदवून घेणाऱ्या शिक्षण संस्थांनी ही त्यापुढे जात संविधानाला समजविण्याची, धर्मनिरपेक्षतेची सोपी परंतु, मजबूत ओळख न करून दिल्याने हा देश या परिस्थितीतून स्वतःचा बचाव करू शकत नाहीये.
मध्यंतरी, चालू असलेल्या कोरोना काळातून मानवतेची बीज पुन्हा पेरली जातील, अस काहीसं वाटतं होत. एकमेकांना होणारी मदत बघता पुन्हा सर्व मिळून उत्क्रांतीपासून नव्याने प्रवास करत इतिहासातील चुका दूर करतील, अशी आशा वाटत होती. दरम्यान, पुन्हा मुस्लीम कोरोना प्रादुर्भावाचे कारण आहे, हा मुद्दा उभा राहिला होता. याकडे बारकाईने बघितले तर जाणवेल की, हे केवळ असंवेदनशील वक्तव्य नसून संपूर्ण माणूसपणावर या भयंकर काळात उडवलेले शिंतोडे होते. बौद्ध भिक्कुंच्या कत्तलीपासून ते आजच्या तारखेपर्यंत देशाच्या इतिहासात पानापानांवर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. भारत पाकिस्तान फाळणी, बाबरी मशीद, गुजरात दंगे, विचारवंतांचे खून असा सर्वच इतिहास रक्ताने माखलेला आहे.
आताच झालेलं ‘हिजाब’ प्रकरण आणि त्यानंतर या आंदोलनाला उभं करणाऱ्या एका तरुणाची हत्या हे सर्व हृदयद्रावक आहे. हर्षा नामक तरुणाची हत्या झाल्यावर अनेक मत मतांतरे निर्माण झाली. प्रसारमाध्यमांनी मुद्दा उचलून धरला. लोक ही सर्व बाजूंनी व्यक्त व्हायला लागली. तरुणाचे आई वडील त्यांच आकलन आणि सामाजिक व्यवस्थेने तयार केलेल्या मानसिकतेनुसार रडू लागले. परंतु, हर्षा धर्मांध राजकारणाचा भाग होता, म्हणून हा मुद्दा येथेच सोडून चालणार नाही, या मताचा मी आहे. हर्षासारखे तरुण धर्मांध शक्तींकडे आकर्षित होतात कसे? त्या विचारांना संपवायला आम्ही सेक्युलर म्हणून राहत असलेल्या भारतीय नागरिकांचे कर्तव्य काय? ही विचारधारा तरुणांना घेवून नक्की काय घडवू बघत आहे? यावर आता सातत्याने चर्चा करण्याची ही वेळ आहे. कदाचित त्यांच्या आप्तस्वकीयांना ही याची गरज वाटली नसेल परंतु, जागरूक, जबाबदारी आणि संविधानवादी भूमिका घेऊन काम करणाऱ्या सर्वांनी मुळापर्यंत पोहचण्याची गरज आहे.
लोकशाहीर वामनदादा कर्डक आपल्या एका गीतात घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना दुजोरा देत ‘हे जग सर्वांच्या हिताचे व्हावे’ याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला लावतात. अशी जबाबदारी स्वीकारत आगेकूच करताना मध्यंतरी सुजात आंबेडकरांच्या नाशिक येथील एका मुलाखतीत सत्ताधाऱ्यांची मुले दंगलीचा, बेसलेस आंदोलनांचा भाग होतांना दिसतात का? असा सवाल केला होता. एकंदरीत ‘सत्ताधारी, सवर्ण, धर्मांधता पसरविणाऱ्यांची मुले स्टडित, आणि बहुजनांची मुले कस्टडीत’ हा अनुमान आजवर आपल्याला लावता आला नाहीये. भारत तरुणांचा देश म्हणवणाऱ्यांनी एक सलग पिढी अशाच पद्धतीने बरबाद केली आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणून गुजरात दंगलीदरम्यान वाताहत झालेल्या ‘अशोक परमार’ला बघायला हवं.
हर्षाचं आंदोलन ही अचानक उफाळलेला मुद्दा होता. त्यावर सकारात्मक -नकारात्मक चर्चा करणाऱ्यांपैकी एकाने ही (सत्ताधारी, माध्यमे आदी.) स्थानिक योग्य त्या भूमिका घेतल्या नाही. उलटार्थी दोन्ही गटांतून आपली मांडणी, बुद्धिमत्ता समजावून सांगण्याच्या शर्यती बुद्धिजीवींमध्ये लागल्या होत्या. तसेच शिक्षण संस्था ही धर्मनिरपेक्ष राष्ट्राच स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवायला अपूर्ण पडल्या, धर्मनिरपेक्षता रुजवायला कमी पडल्या, अस म्हणावं लागलं. एका मुलीमागे धावत जाणारा तरुणांचा एक घोळका बघता मेंदूत कालवलेल्या विषाचा हा उच्चांक आहे, अस जाणवत.
मुळात या विचारांना सत्ताधाऱ्यांच आश्रय असल्याचं आपण जाणतो. उत्तरप्रदेशात होऊ बघणाऱ्या निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवून धार्मिक मुद्दे रेटून पुन्हा सत्तेत बसणे इतकेच या मागील प्रयोजन आहे. उत्तर प्रदेश मधील हिंदू, सवर्ण मतदार डोळ्यासमोर ठेवून धार्मिक ध्रुवीकरणासाठी कर्नाटकाच्या भूमीचा वापर केला जातोय. हिंदू – मुस्लीम वाद पेटवून उत्तर प्रदेशमधील हिंदू मतदारांना भुलवण्यासाठी धार्मिक अपप्रचार केला जातोय. बांग्लादेशातून मुस्लीम लोकं मोठ्या प्रमाणात ट्रक भरून मतदानासाठी आणले जात असल्याची काही व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करत हिंदूंना भीती घातली जात आहे.
याबाबत ही विरोधी पक्षांपासून सर्व सामान्यांपर्यंत कोणी ही अनभिज्ञ नाही. उत्तरप्रदेशातील सामान्यांच्या वाढता रोष संघप्रणीत भाजपा पक्षाला सामान्यांची निराशा केल्यामुळे सत्तेत बसवणार नाही हेदेखील त्यांना ठाऊक असल्याने धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा रेटला जातोय. परंतु, याबाबत कर्नाटकातील सत्तेत असलेल्या लोकांना तरुणाची हत्या होईपर्यंत हे ध्रुवीकरण करावं लागत असेल तर किती खेदाचे आहे, असे म्हणावे लागेल!
आज या हत्येच्या प्रकरणानंतर हर्षा नसल्याचे परिणाम त्यांच्या आप्तस्वकीयांना भोगावे लागतील. हर्षाचे मारेकरी ही सापडतील. कदाचित तो असलेल्या वैचारिक गोटात हळहळदेखील व्यक्त होईल. परंतु, धर्मांध मुद्दे उचलून धरणारे, माथे भडकवणारे पुन्हा नव्याने उभे राहतील. ही दिशाभूल करणारी फॅक्टरी अद्याप बंद पडणार नाही.
धर्म हा मानवाच्या गरजेतून निर्माण झाला आहे. त्याची गरज बहूधा काही काळासाठी अथवा अनंत असू शकते. त्यात मानवी प्रगतीसोबत होणारे बदल ही त्याने स्वीकारायला हवे. धर्माने मनुष्यसोबत प्रबळ व्हायला हवे आणि मनुष्यत्वाचा सांभाळ करायला हवा. परंतु, दरम्यान ही अंधुक रेषा ही खोलदरी इतकी भयंकर आहे. ही धर्मांधता मानवाचा केवळ अवगुण नसून सामाजिक विकार आहे आणि त्याचमुळे या देशातील तरुण चुकीच्या दिशेने उद्ध्वस्त होतील किंवा संपतील, ही देश म्हणून आपल्यासाठी लज्जास्पद बाब ठरेल. त्यामुळे या विचारांविरोधात प्रबोधनाची एक मोठी जबाबदारी पेलण्यासाठी ‘आम्ही भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने सक्रिय होण्याची गरज आहे.
– संविधान गांगुर्डे
मो – 7083978770