पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांनी मागील तीन वर्षांपासून फेलोशिपची जाहिरात काढलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून उच्च शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या गंभीर विषयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पुण्यात जोरदार निषेध आंदोलन केले.
आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी शासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबवावे आणि तत्काळ फेलोशिपची जाहिरात काढावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर अध्यक्ष चैतन्य इंगळे, उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड आणि युवा आघाडी पुणे शहर सचिव नितीन कांबळे यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. ऍड. तायडे म्हणाले की, “फेलोशिप थांबवल्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात जात आहे.
शासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. शासनाला इशारा देत सांगितले की, “जर तात्काळ फेलोशिप जाहिरातीबाबत निर्णय झाला नाही, तर वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन छेडेल.”