- चंद्रकांत कांबळे
पुणे : दिवाळी काळात खासगी बस वाहतूकदारांनी एसटी महामंडळाच्या कमाल भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारत असेल तर प्रादेशिक परिवहन विभागात तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले होते.त्यानंतर १३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान व्हॉट्सअॅप व ईमेलच्या माध्यमातून एकूण ५३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी फक्त दोन तक्रारी भाडेवाढीसंदर्भातील असून, उर्वरित तक्रारी विविध नियमभंगासंबंधीत आहेत. १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान विविध प्रकारचे वाहतूक नियम मोडल्यामुळे १९८ खासगी बसवर ई-चलनाच्या माध्यमातून आरटीओकडून दंडात्मक कारवाई करत एकूण १७ लाख ६५ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
प्रवाशांकडून आलेल्या ५३ तक्रारींपैकी केवळ दोन प्रवाशांनी सर्व आवश्यक माहितींसह नाव, मोबाईल क्रमांक, तिकिटाचा फोटो व वाहन क्रमांक व्यवस्थित तक्रार दाखल केली आहे. मात्र, उर्वरित ५१ तक्रारींमध्ये अशी कोणतीही माहिती अथवा पुरावा जोडले नसल्याने संबंधितांवर कारवाई करणे परिवहन विभागासमोर आव्हान ठरत आहे.
RSS मुर्दाबाद स्टेटस ठेवल्याने तरुणाला मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळे आरोपींवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल
करण्यात आलेली कारवाई
- सीटबेल्ट वापर न करणे – १९
- अतिरिक्त प्रवासी – ०१
- वाहनात माल वाहतूक – २३
- आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग अडवणे – ०७
- आग विझविण्याचे यंत्र नसणे – १८
ई-चलनाद्वारे आकारलेला दंड
-एकूण बसची संख्या – १९८
-वसूल दंड – ११,७४,९५०
-प्रलंबित दंड – ५,९०,५००
-एकूण दंडरक्कम – १७,६५,४५०
आरटीओकडून तक्रारीसाठी नंबर
दरवर्षीप्रमाणे वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याच्या तक्रारी आरटीओकडे येतात. त्यामुळे यंदा पुणे आरटीओने आगाऊ पाऊल उचलत खासगी बस संघटनांची बैठक घेऊन प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच प्रवाशांनी जादा भाडेदर आकारणीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले होते.
योग्य कारवाई केली जाईल
प्रवाशांची काही तक्रार असल्यास त्यासाठी आम्ही व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेलची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जादा भाडे आकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे तसेच इतर तक्रारी असल्यास त्या पुराव्यांसह पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. ज्या प्रवाशांनी अपूर्ण माहिती पाठवली आहे, त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
–स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे






