पुणे : पुणे पोलिसांनी शहरात मोठी कारवाई करत तब्बल २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई कोंढवा आणि बिबवेवाडी या दोन भागांत करण्यात आली असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. कोंढवा परिसरातून १५ लाख रुपयांचे अफिम तर बिबवेवाडीमधून ११ लाख रुपयांचे एम.डी. हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
कोंढव्यामध्ये १५ लाखांचे अफिम जप्त
पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी गस्तीवर असताना त्यांना कोंढवा परिसरात एक संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्याकडे ७४९ ग्रॅम अफिम हा अमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत १४ लाख ९८ हजार रुपये आहे. या प्रकरणी भगीरथराम रामलाल बिश्नोई याला अटक करण्यात आली आहे.
बिबवेवाडीमध्ये ११ लाखांचे एम.डी. जप्त
दुसऱ्या कारवाईत, अमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी ५ जुलै रोजी बिबवेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ११ लाख रुपये किमतीचा एम.डी. हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी विठ्ठल रघुनाथ कराडे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.