पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित सामाजिक कार्यकर्त्या महिलांना पोलिसांनी छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २४ तासांहून अधिक काळ उलटूनही पुणे पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त झाले असून त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पोलिसांना जाब विचारला
या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यावर प्रकाश आंबेडकर यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की, “ती मुलगी २५ वर्षांची आहे. कुठलातरी पोलीस औरंगाबादमधून येतो आणि घरात घुसतो. पोलीस कोणत्या कायद्याखाली घरात घुसतात? पोलिसांना घरात घुसण्याचा परवाना दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही आधी एफआयआर नोंदवून घ्या आणि मग त्याचा तपास करा.” यावर पोलीस अधिकाऱ्याने दोन दिवसांचा वेळ मागितला असता, आंबेडकर चांगलेच संतप्त झाले.
त्यांनी म्हटले की, “दोन दिवस नाही, ताबडतोब एफआयआर दाखल झाली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो, धरणं देऊन बसा. कायदा हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. चौकशी होत राहील, त्यातून सत्य समोर येईल. पण एफआयआर नोंदवायला पोलिसांचा इतका विरोध का? तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू का?”
पोलीस आरोपींना का पाठीशी घालत आहेत?
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये पुणे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगितले, कायदा म्हणजे कायदाच असतो!”
ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, “पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अॅट्रोसिटी कायद्याचे महत्त्व आणि पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या १५ तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढत आहेत. तरीही पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलीस आरोपींना का पाठीशी घालत आहेत?”
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास एसपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे.
नेमकी घटना काय?
औरंगाबादहून पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका विवाहित महिलेला तीन दलित महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यांनी त्या महिलेला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल करून तिला स्वावलंबी बनण्यासाठी सहकार्य केले. मात्र, औरंगाबाद येथील त्या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती निवृत्त पोलीस अधिकारी आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरुड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसी दडपशाहीला ठणकावून सांगा, कायदा कायदा असतो…!
कोथरूड ते संविधान व्हाया औरंगाबादलेखक : आज्ञा भारतीय एका स्त्रीचं जगणं सासरच्या छळामुळे असह्य झालं आणि तिनं निर्णय घेतला की...
Read moreDetails