जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथील पाटोदा साठवण तलावामुळे बाधित झालेल्या दलितांच्या वस्तीचे पुनर्वसन आणि बोगस लाभार्थी अनुदान घोटाळ्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर शासनाचा निधी हडपल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यानंतर, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मित्तल यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनावर दीपक डोके, ॲड. अशोक खरात, विजय जाधव, सतीश डोंबे यांच्यासह शेकडो महिला व गावकऱ्यांच्या सह्या आहेत.