करमाळा तालुक्यातील पोटेगाव येथे होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीने २५ जुलै रोजी करमाळा तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. मोरांच्या नैसर्गिक अधिवासावर आणि गरीब कुटुंबांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि स्थानिक नेत्यांवर टीका करत म्हणाले की, “हा प्रकल्प म्हणजे गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त करून धनदांडग्यांना पोसण्याचा प्रकार आहे.” मोरांचे वास्तव्य आणि गोरगरिबांचे जगणे धोक्यात येत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला असून, मागणी मान्य न झाल्यास पुढील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.