अकोला : सांगलीचे विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोला येथील यशवंत भवन या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, अय्याज नाईकवाडी आदी उपस्थित होते.
सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. पण काल झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा शिवसेना (ठाकरे गट) यांना गेली. त्यामुळे विशाल पाटील यांच्या निष्ठेची चेष्टा झाली अशी चर्चा सुरू होती.
ॲड. प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या भेटीमुळे राजकारणात मोठी घडामोड होणार का ? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीची सांगली लोकसभा मतदार संघात मोठी ताकद असल्याने नवीन राजकीय घडामोड होणार अशाही चर्चा सुरू आहेत