मुंबई : बोधगया येथील जागतिक स्तरावरील पवित्र बौद्ध स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी (VBA) आपला लढा सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
ॲड. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघेही महिनोनमहिने बिहारमध्ये प्रचार करत आहेत, मते मिळवण्यासाठी सभा घेत आहेत आणि मोठी आश्वासने देत आहेत. मात्र, महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या समर्थनात या दोन्ही नेत्यांनी आजवर एक शब्दही उच्चारलेला नाही.
मोदी-गांधींच्या ‘जाणीवपूर्वक मौना’वर आक्षेप
ॲड. आंबेडकर यांनी या मौनावर तीव्र आक्षेप घेत, हे मौन अज्ञान नसून, जाणीवपूर्वक आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, यावरून हे स्पष्ट होते की, बौद्ध धर्मीयांचा आवाज आणि त्यांना मिळणारा धार्मिक न्याय हे दोन्ही नेत्यांसाठी कोणतेही महत्त्व ठेवत नाहीत.
‘मंदिरातील फोटो’ आणि ‘भिक्खूंकडे पाठ फिरवणे’
धार्मिक स्थळांप्रती असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनातील विसंगतीवर बोट ठेवत ॲड. आंबेडकर म्हणाले की, जेव्हा मंदिरांमध्ये फोटो काढायचे असतात, तेव्हा हे दोन्ही नेते सर्वात पुढे दिसतात. पण जेव्हा भिक्खू जगातील सर्वात पवित्र बौद्ध स्थळाच्या न्यायसंगत व्यवस्थापनाची मागणी करतात, तेव्हा हे दोघेही त्यांच्याकडे पाठ फिरवतात. हेच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे बौद्ध धर्मीयांप्रति असलेले खरे रूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, जोपर्यंत बोधगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहील! असा निर्धार व्यक्त केला आहे.






