अकोला : ना पक्क घरं, ना घरात वीज, बँकेत खातं आहे, पण त्यात रक्कम नाहीये, ना संसार, रेशन कार्डावरही फक्त एकटेच. इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नसताना ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी उभे केले.
वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच पदाकरीता उमेदवारी जाहीर झाली अन् निवडून येत ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली. हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आकोलखेड गावातील. हे सरपंच आहेत दिगंबर पिंप्राळे. सरपंच अजूनही गावात पायी फिरत असल्याचं समजलं आणि त्यांची हलाखाची परिस्थिती पाहून वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरपंच पिंप्राळेंना भन्नाट दुचाकीचे गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
अकोला जिल्ह्यात मागील वर्षी २५८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आकोलखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामस्थांनी अशा उमेदवाराला सरपंच पदासाठी उभे केले, की त्याबद्दल तुम्ही ऐकूनही थक्क व्हाल. दिगंबर पिंप्राळे असं उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव हाेय. त्यांनी एक रुपयाही खर्च न करता विजय मिळवला होता. आता थेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून गिफ्ट मिळाल्याने जिल्हाभर याची चर्चा आहे.