वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक दिवंगत सुनील जगताप यांची कन्या!
अकोला : राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या मृत्यूने प्रगतीच्या मनावर परिणाम झाला. ती नैराश्यात गेली. त्यात प्रकृती अस्वस्थ्यतेने तिला ग्रासलेले अशा परिस्थितीतून बाहेर पडत आपल्या लक्ष्यावर केंद्रीत करून प्रगतीने राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर रात्री अंतिम निकाल जाहीर झाला. सुनील जगताप असे प्रगतीच्या वडीलांचे नाव. अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडीमधून नगरसेवक म्हणून ते निवडुन आले होते. मात्र, ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले.
त्यामुळे प्रगती नैराश्यात गेली. डिसेंबरमध्ये पूर्व परीक्षा असताना, त्याचा अभ्यासात तिचे मन लागत नव्हते. मात्र, मित्र मैत्रिणी आणि घरच्यांच्या मदतीने त्यातून बाहेर पडून प्रगतीने केवळ अभ्यासावर फोकस केले. सुरुवातीपासून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तिने तयारी सुरू केली. घरी मोठा भाऊ एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेत काम करतो. मात्र, आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगातून प्रशासकीय सेवा करण्याची इच्छा मनोमन ठेवत २०१८ ते २२ या दरम्यान ती कृषीसेवक म्हणून कार्यरत होती.
ते पद सोडून तिने राज्यसेवेची तयारी सुरू केली. त्यातून तिची २०२३ मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली होती. मात्र, ती कळमेश्वर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाली.याच दरम्यान तिच्या तब्येत झालेला बिघाड, त्यातून आयसीयूत तिच्यावर काही महिने उपचारही सुरू होते. मात्र, आपल्या धेय्याने पछाडलेल्या प्रगतीने अखेर राज्यसेवेत कमाल केली. आता तिला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती मिळणार आहे.
ते दिवस खुपच कठीण – प्रगती जगताप
आजारपण आणि वडीलांचे निधन हा कालावधी बराच कठीण होता. त्यामुळे नैराशेत गेले. मात्र, मित्र आणि परिवारांनी साथ दिली. त्यातून बाहेर पडले. आज यश मिळाले आहे. मात्र, ते बघण्यासाठी बाबा हयात नाहीत. त्यामुळे हे यश मित्र आणि कुटुंबियांना समर्पित करते अशी प्रतिक्रिया प्रगतीने ‘सकाळ’शी बोलताना दिली.
युपीएससीची तयारी सुरुच राहणार –
राज्यसेवा परीक्षेत मिळालेले यश आनंददायी आहे. मात्र, सुरुवातीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अभ्यास करीत आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेत यश मिळाले असले तरी युपीएससीची तयारी सुरुच राहणार असल्याचेही ती म्हणाली.




