मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची गंभीर घटना आज घडली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. तसेच राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांच्यासोबतही पोलिसांनी धक्काबुक्की केलीआहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीकडूनच स्त्रीविरोधी वक्तव्य होणे अत्यंत लज्जास्पद असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि लैंगिक असमानतेविरोधात आवाज उठवणाऱ्या या आंदोलनात पोलिसांनी केलेली ही कारवाई लोकशाहीवरील आघात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवत पोलिसांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांना महिला आयोगाच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या पोलिसांकरवी केलेल्या मारहाणीवरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.






