परिवर्तनाच्या लढ्यासाठी जनसंघटन करण्यासाठी ध्रुविकरण कोणत्या रेषेवर करायचे हा कळीचा मुद्दा आहे. महात्मा फुलेंनी माळी, कुणबी, धनगर, आदी शूद्र जातींना भटशाहीविरुध्द जागे केले. तसेच बाबासाहेबांनी ५२% ओबिसी शोषणाचा बळी आहे म्हणून ’मागासवर्गीय आयोगा’ ची तरतूद घटनेत केली. या दोघांच्याही उक्ती आणि कृतीतून हे ध्रुविकरण ब्राह्मणी पुढाकाराखालील ऊच्चवर्णिय विरुध्द शूद्रादीशूद्र व मुसलमान असेच असणार आहे हे स्पष्ट केले आहे.
ब्राह्मणीशक्तींचे समाजाबद्दलचे अचूक भान
ओबीसी हा भारतीय समाजक्रांतीच्या राजकारणातील किती कळीचा प्रश्न आहे हे रामजन्मभूमी आंदोलनाने दाखवून दिले आहे. मंडलच्या प्रश्नावर ५२% ओबीसी, १२% दलीत, मुसलमान व आदिवासी एक झाले तर येथील ब्राह्मणी वर्चस्वाचा पाडाव होईल हे जाणून राम रथयात्रेचा व रामजन्मभूमीचा बनाव झाला व ब्राह्मणी पुरोगाम्यांनी तुच्छतेने वागवलेला हा समाज ’हिंदू एकते’ च्या घोषणेभोवती गोळा होऊ लागला. भाजपाने तिकीट दिलेल्या ओबीसींची संख्या पाहिली तर त्यांच्या राजकीय भानाबद्दल खात्री पटेल. पुरोगामी चळवळ मात्र या बाबतीत अजून चाचपडतच आहे.
धम्मपरिवर्तनाची ब्राह्मणी धर्माला लाथ
ब्राह्मणी धर्माने निरंतर दिलेल्या अवहेलनेच्या आणि अप्रतिष्ठेच्या जोखडातून दलितांना बाहेर काढून त्याची अस्मिता जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्विकार केला. इतिहासात एवढा ब्राह्मणी धर्माविरुध्द झालेल्या धर्म क्रांतीतून जन्माला आलेल्या बौध्द धर्माची त्यांनी निवड केली. त्यामागचा उद्देश हा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा होता. ती धर्म प्रसाराची चळवळ नव्हती. ’सारा भारत बौध्दमय करीन’ बाबासाहेबांच्या या घोषणेचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. नाही तर स्वत: बाबासाहेबांनी धम्म प्रसारापेक्षा राजकारणाला व समाजकारणाला महत्व दिले नसते. सर्व बहुजनांना आरोपीच्या पिंज-यात उभे करून “तुम्ही बौध्द होण्यास तयार आहात काय?” या प्रश्नाचा उपसिध्दान्त बौध्द धर्म न स्विकारलेला अस्पृश्य समाज, आदिवासी, मार्क्सवादी, समाजवादी, परिवार व इतर सारे पुरोगामी आंबेडकरवादाच्या विरोधी आहेत असा होतो; याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
कॉंग्रेस पुढची लाचारी
दुर्दैवाने धम्मपरिवर्तनानंतर बाबासाहेब फार दिवस राहिले नाहीत. त्यांच्या मागे आंबेडकरी चळवळ स्वत:च्या वेठीस बांधण्याचे काम कॉंग्रेसने केले. सौदेबाजी करून एखादे दुसरे मंत्रिपद अथवा इतर सत्तेची आमिषे दाखवून, वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना अथवा महाजनांच्या सहाय्याने या समाज गटांना बांधून घेण्याचे कॉंग्रेसचे धोरण होते. आपण स्वतंत्रपणे एकटे लढलो तर आपला टिकाव लागायचा नाही, याची प्रत्येक समाज गटातील पुढा-यांना जाणीव असल्याने ते कॉंग्रेसपुढे लाचार बनले. या वस्तुस्थितीला बदलायचे असेल तर या बहुजनांनी एकत्र येवून एकमेकांच्या मताच्या सहाय्यानेच कॉंग्रेसला शह देऊन बहुजनांकडे सत्ता देता येईल असे बहुजन महासंघाला वाटते.
धर्माचे स्थान
धम्मक्रांतीच्या प्रश्नाची दुसरी बाजूही आपण लक्षात घेतली पाहिजे. चर्मकार, मांग, ढोर, इत्यादी दलीत जाती बाबासाहेबांच्या धम्मपरिवर्तनात सामिल झाल्या नाहीत. या मागची कारणे काय? जातिव्यवस्थेच्या मानसिकतेमुळे त्यांनी बाबासाहेबांना स्विकारले नाही. हे एक जरूर महत्वाचे कारण आहे. परंतु दुसरेही एक महत्वाचे कारण आहे.
“माणसाचा धर्म” अंगरख्याप्रमाणे बदलायची गोष्ट नाही. असे म्हणणा-या महात्मा गांधींनी भारतीय माणसांच्या श्रध्देचा आशय नेमक्या शब्दात व्यक्त केलेला आहे. कुणिही आपला धर्म बदलता कामा नये असे गांधी आग्रहाने मांडत असत. स्वत:चा मुलगा हिरालाल याने मुस्लिम धर्म स्विकारला हे कळल्यानंतर त्याचे पुन्हा धर्मपरिवर्तनासाठी मत बदलण्यास गांधींनी विरोध केला होता. माणसांमाणसांतील भेदांच्या संदर्भात. ’धर्माच्या निरर्थकतेवर’ आणखी वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. धर्मश्रध्दा म्हणजे केवळ रुढी आणि शोषणाची व्यवस्था अशी समजूत पुरोगाम्यांची आहे. सर्वसामान्य माणसांचा धर्म त्याला न्याय, नितीची शिकवण देतो अशी सामान्य माणसाची श्रध्दा आहे. अब्राह्मणी हिंदू परंपरेतील (बौध्द, जैन, लिंगायत, शीख, वारकरी, शाक्त, इ.) अशा अनेक लोकधर्मांनी सत्य, अहिंसा आणि समतेची शिकवण माणसाला दिली आहे. संस्कृती आणि कलांचा विकास धर्माच्या आधारेच झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. धर्माला नाकारणे म्हणजे स्वत:ची मुळे छाटणे असे सामान्य माणसाला वाटते. म्हणून धर्मसुधारणांना अनुकूल असलेला माणूस धर्म त्यागाला तयार नसतो. या सा-याबद्दल पोथीनिष्ठ व संवेदनाहीन भूमिका घेवून, लोकधर्म परंपरा पाळणारे हिंदू व ब्राह्मणी धर्म यांना एकाच मापाने मोजण्याची अक्षम्य चूक भारतातील परिवर्तनवाद्यांनी व पुरोगाम्यांनी केलेली आहे.
दलीत नेतृत्वाचा प्रश्न
’भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन महासंघ’ प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत असे आग्रहाने व स्पष्टपणे सांगत असतो. त्या अर्थाने बहुजन महासंघाला मानणा-या सा-या बहुजनांनी एका दलिताला आपला नेता मानला आहे ही वस्तुस्थिती आहे.
ही भूमिका घेण्यामागे बहुजन महासंघाचे भारतीय समाज व राजकारणाबद्दलचे सखोल निदान आहे. लोकशाही मार्गाने सत्तेचे फेरवाटप होत असता भारतीय समाजामध्ये ब्राह्मणी संस्कारांच्या विषामुळे जी एक उतरंड निर्माण झाली आहे; ती उलट करून मोडण्यावरचे लक्ष कधिही विचलीत होवू नये यासाठी या समाज व्यवस्थेने ज्या दलितांचे सर्वांत जास्त शोषण केले त्याच्या हाती नेतृत्व अशी ही भूमिका आहे. आणि ज्यावेळी बहुजन महासंघ सत्ताबदल घडवून आणेल; तेव्हा सा-या समाजाने ते नेतृत्व स्विकारलेले असेल.
बहुजन महासंघाच्या गैरसमजातून निर्माण झालेले प्रश्न
बहुजन महासंघ म्हणजे जातींचे फेडरेशन (कडबोळे) नव्हे काय?
बहुजन महासंघाच्या संघटनांचा पाया जात हाच आहे की नाही? तसे नसेल तर त्यांच्या संघटनांचा पाया कोणता? ते आंबेडकरवादात बसते काय?
बहुजनवाद आणि बहुजन महासंघ यांच्यामुळे जातीव्यवस्था घट्ट होईल की, नाही?
जातीव्यवस्था घट्ट होणार असेल तर ब्राह्मणवादाला पूरक होईल की, नाही?
पर्यायाने बहुजन महासंघ ब्राह्मणी व्यवस्थेला समर्थक ठरतो की, नाही?
जातीनिहाय सत्तेचे वाटप व्हावे असे डॉ. आंबेडकर कधी म्हणाले होते काय? तशा प्रकारचे राजकरण त्यांनी कधी केले होते काय?
जातीतील काही माणसं सत्तेत गेली म्हणजे त्यांच्या जातीला सत्ता मिळाली असे म्हणता येईल काय?
जातीनिहाय सत्तेचे वाटप शक्य आहे काय?
बहुजन महासंघ जात या राजकारणावरच फुटणार नाही काय?
बहुजन अस्मिता
जातीनिहाय सत्तेचे वाटप करावे असे महासंघाला वाटत नाही. किंबहुना आपली जात अथवा ब्राह्मणीकरणामुळे ’सवर्ण हे बिरुद चिकटवून घेतलेले’ या वर्तुळाच्या बाहेर जाण्याची अनेक बहुजन जातींची मानसिकता नाही. यावर मात करून स्वत:च्या जातपलिकडील ’बहुजन’ ही अस्मिता ह्या जातींनी घ्यावी हा बहुजन महासंघाचा प्रयत्न आहे. सत्तेचे आजचे वाटप हे ८५% लोकसंख्येच्या बहुजनांना १५% व १५% ऊच्चवर्णियांना ८५% असे आहे. ते उलटे व्हावे व संख्येच्या प्रमाणात ’सत्ता, संपत्ती व लोक-यात वाटा मिळावा अशी भूमिका आहे. सत्तेचा असमतोल समजावून सांगत असताना बहुजन महासंघाने धनगर, बंजारा, वंजारी, वगैरे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या जातींना सत्तेमध्ये किती क्षुल्लक स्थान आहे; हे ठसविण्यासाठी विधानसभेतील आमदार अथवा मंत्री यांचा खरा खुरा हिशोब सडेतोडपणे मांडला. १०% लोकसंख्या असलेल्या (धनगर) समाजाचे आमदार १% आणि २०% (मराठा) लोकसंख्येचे आमदार मात्र ६०-७०% (ते देखील निवडक महाजन घराण्यातील), हे व्यस्त प्रमाण बदला असा तो मुद्दा होता. त्याचा अर्थ जातीनिहाय राजकीय सत्तेचे वाटप असा होत नाही. उलट ज्यांची लोकसंख्या नगण्य आहे; अशा लोहार, कुंभार, कोष्टी, गोंधळी, इ. जातींना सुध्दा सत्तेत सहभाग दिला पाहिजे अशी बहुजन महासंघाची भूमिका आहे. जातीतील काही माणसांशी सौदा करून अख्ख्या जातीला वेठीस धरण्याचे जे राजकारण कॉंग्रेसने केले; त्याला ’संख्येच्या प्रमाणात सहभाग’ या मागणीने पायबंद बसतो.
जातींचे फेडरेशन (कडबोळे) \
महासंघ याचा शब्दश: अर्थ फेडरेशन असा आहे. महासंघाचे कडबोळे होऊन त्याचा चुरा होणार की, तो समर्थपणे बहुजन सत्तेच्या परिवर्तनाचे वाहक होणार हे या चळवळीतील आम्हा सा-या कार्यकर्त्यांच्या वकूबावर व आम्ही आमचे तत्वज्ञान किती जनताभिमुख करणार आहोत त्यावरून ठरणार आहे. बाबासाहेबांनीसुध्दा ’शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ तेव्हा त्याचा उद्देश जाती घट्ट करणे हा नव्हता; तर या समदु:खी परंतु वेगळे अस्तित्व असणा-या जातींना संघटीत करुन एकमेकांची ओळख करून देवून, सामायिक अस्मिता निर्माण करणे हा होता.बहुजन महासंघ देखील सा-या मागास जातींना आपापली वर्तुळे भेदून बहुजन अस्मिता उभी करण्याचे अवाहन करीत असतो.
वैचारिक गोंधळामधून निर्माण होणारे प्रश्न
बहुजनवादामुळे आंबेडकरवाद्यांच्या लढाऊ वृत्तीचे खच्चीकरण होत नाही का?
बहुजनवादामुळे बौध्द चळवळ थंडावली आहे का?
ऊच्च जातीवर्ग, मध्यमजातीवर्ग, कनिष्ठ जातीवर्ग असे जातीचे वर्ग समाजात अस्तित्वात आहेत का? नसतील तर वरीलप्रमाणे जातींचे वर्ग पाडणे अवास्तव नाही का? अशा मांडणीमुळे जातीअंताच्या लढ्याला चालना मिळेल काय? कारण कोणत्याही दोन जाती समान नसताना जातीचे असे वर्ग पडू शकतात काय? प्रत्येक जात स्वयंभू असताना तिचे वर्गिकरण कसे करता येईल? परंतु प्रत्येक जण हा स्वयंभू आहे.
आतापर्यंत मांडलेले विवेचन लक्षात घेतल्यानंतर हे वरील प्रश्न वैचारिक गोंधळातून निर्माण झालेले आहेत; एवढीच टिका पूरेशी आहे. (साभार: सुगावा, जानेवारी, १९९६)
रेखा ठाकूर
मुंबई