अकोला : भारत देशातील सुरु असलेली फुले-आंबेडकरी चळवळ हि भारतीय राज्यघटनेनी दिलेल्या मुल्यांनी प्रामाणिक असलेली चळवळ असुन ती गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करणारी चळवळ असुन फुले आंबेडकरी विचार हाच खरा राष्ट्रनिर्मितीचा पाया असल्याचे प्रतिपादन जेष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. संजय मुन यांनी केले. ते दिवंगत बी.आर. शिरसाट यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित व्याख्यानात बोलत होते.
दिवंगत लोकनेते बी.आर. शिरसाट यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात सोमवारी (ता.३१) जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा साहित्यिक डॉ. संजय मुन यांनी फुले-आंबेडकरी चळवळीची पुनर्मांडणी या विषयावर बोलत असताना भारत देशात विद्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ असो कि फुले आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व गेल्या ३०-४० वर्षांपासून राजकीय पक्ष घेत आहे ते विद्वानांना घेता येत नसल्याची बाब दुर्दैवी आहे. अशी खंत सुद्धा यावेळी डॉ. मुन यांनी व्यक्त केली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अकोला जिल्हाबाहेरील फुले आंबेडकरी चळवळीचे राजकारण हे एकजातीय होत असल्यामुळे आपल्याला अपयश येत आहे. अकोल्यात मात्र ते दिसुन येत नाही त्यामुळे फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकारणाला यश प्राप्त होते हे गौरवास्पद आहे. त्यामुळे अकोल्यातील फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या यशाच्या गुरुकिल्लीचा योग्य वापर संपुर्ण महाराष्ट्रात करा तसेच फुले आंबेडकरी चळवळीला पडलेली किड काढण्यासाठी विद्वानांनी पुढाकार घेऊन चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन जेष्ठ विचारवंत डॉ. संजय मुन यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पि.जे.वानखडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणुन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, प्रा.डाॅ. भारत शिरसाट, अॅड. संतोष राहाटे, संतोष हुशे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जि.प.अध्यक्षा संगीता अढाऊ, जि.प. सभापती आम्रपाली खंडारे, मायाताई नाईक, योगिता रोकडे, रिजवान परवीन, पंचायत समिती सभापती आम्रपाली गवारगुरु, सुनिता टप्पे, शारदा सोनटक्के, आम्रपाली तायडे, पंचायत समिती उपसभापती किशोर मुंदडा, इम्रान खान, राजकन्या कवळकार, अजय शेगोकार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल शिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजित शिरसाट यांनी केले.