अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत फुले आंबेडकर विद्वत्त सभेच्या बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. वसंत डोंगरे सर, प्रा. आर. एन. वानखडे, झिने सर, सावदेकर, इंगळे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला १ लाख १४ हजार २२४ रुपये मदत निधी दि. १५ जानेवारी रोजी परभणी येथे जाऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी त्यांचा भाऊ प्रेमनाथ सुर्यवंशी आणि अविनाश सुर्यवंशी यांच्या कडे प्रा. सुरेश शेळके सर यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.
आंदोलनकारी तरुणांची पोलीस कोठडीत मारहाण करुन क्रुरपणे हत्या करायची आणि सहायता निधी म्हणून १० लाख रुपये पिडित कुटूंबाच्या तोंडावर फेकून मारायचे आणि आमच्या तरुणांच्या जीवाची किंमत पैशात ठरवायची हा अधमपणा, नीचपणा कुठल्याही स्वाभिमानी व्यक्ति ला सहन होणारच नाही आणि म्हणून स्वाभिमानी विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी या शहीद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईने शासनाकडून मिळणारे १० लाख रुपये नाकारले आणि शासनकर्ते यांच्या कडे न्यायाची मागणी केली.पैसे नको माझ्या मुलाचे मारेकरी शोधा आणि त्यांना शिक्षा द्या.
१० लाख रुपये सहायता निधी नाकारणाऱ्या मातेला विजयाबाई व्यंकट सुर्यवंशी यांना सॅलूट केला पाहिजे, त्याचे कारण असे की, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला राहण्यासाठी परभणी शहरात स्वतः चे घर सुद्धा नाही. अतिशय विपण्णा अवस्थेत जगणाऱ्या मजुरी करुन उदरनिर्वाह करणा-या मातेने स्वाभिमानी बाणा दाखवित १० लाख रुपयांना ठोकर मारणे एवढी साधी गोष्ट नाही.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईने १० लाख रुपयांना लाथ मारली त्या स्वाभिमानी कुटूंबाचा स्वाभिमानी बाणा कायम ठेवला पाहिजे, त्यांचा स्वाभिमान गरीबीच्या अंधा-या खाईत गटांगळ्या खाऊ नये म्हणून आंबेडकरवादी समुहाने ठरविले. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला आर्थिक चटके बसणार नाहीत यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा फुले आंबेडकर विद्वत्त सभेने १ लाख १४ हजार २२४ रुपये आर्थिक मदत दिली आहे. आणि इतर जिल्ह्यातील फुले आंबेडकर विद्वत्त सभेचे समन्वयक निधी संकलन करीत आहेत.
पिडित कुटूंबाच्या पाठिशी खंबीरपणे ऊभे राहणे. मोफत कायदेशीर मदत करणे. रहायला छत उपलब्ध करून देणे, वैचारिक पाठबळ देणे. मानसिक भरभक्कम आधार देणे.आर्थिक आधार देणे. अशाप्रकारे सर्वच बाबतीत पिडितांचा सांभाळ करण्याची श्रीमंती फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीतच आहे.
सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री, खासदार, आमदार, जातीचा माज असलेले सगळे जातदांडगे जातीच्या कोंडवाड्यात बंदिस्त झाले आहेत. ते जातीच्या भिंती ओलांडू शकत नाहीत हे उभ्या महाराष्ट्राने संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात अनुभवले आहे.
जाती ग्रस्त लोकप्रतिनिधी,नेते आणि कुपमंडूक वृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपली सगळी ताकद खर्ची घातली आणि संतोष देशमुख कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे असा पवित्रा घेतला मात्र सोमनाथ सुर्यवंशी यांना वा-यावर सोडून दिले त्याचे कारण केवळ आणि केवळ ” जातं ” आहे हे वास्तव आहे.
मात्र आंबेडकरी चळवळ जातीच्या भिंती उध्वस्त करीत निडरपणे स्वांतत्र्य, समता, बंधुता,न्याय,तत्वाला अनुसरून वाटचाल करीत असते ही श्रीमंती अन्य कुठल्या समुहाकडे आहे का.?
आंबेडकरी चळवळ जातीच्या भिंती ओलांडून पिडित कुटूंबाला सर्वच प्रकारची मदत करायला पुढे सरसावते ही श्रीमंती फक्त आंबेडकरी चळवळीतच आहे हे वास्तव समाजमान्य व्हावे अशी अपेक्षा फुले – आंबेडकर विद्वत्त सभेचे भास्कर भोजने यांनी व्यक्त केली.