मुंबई : माणुसकी आणि तत्परतेच्या जोरावर परभणी येथून गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करून त्यांना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे विजय दत्ताराम जमदाडे यांचा शोध लागला असून, २५ जानेवारी २०२६ रोजी चेंबूर येथे त्यांचे कुटुंबीय आणि त्यांची भेट झाली.
नेमकी घटना काय?
परभणी येथील रहिवासी असलेले विजय दत्ताराम जमदाडे हे ५ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता झाले होते. २० दिवसांहून अधिक काळ लोटल्याने त्यांचे कुटुंब चिंतेत होते. मात्र, २४ जानेवारी २०२६ रोजी चेंबूरमधील लालडोंगर, सुमन नगर परिसरात शकील शेख आणि हुसैन नूरबाश या दोन तरुणांना विजय जमदाडे हे संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांनी जमदाडे यांची विचारपूस केली असता, ते हरवल्याचे लक्षात आले.
अशी जुळली मदतीची साखळी
शकील शेख आणि हुसैन नूरबाश यांनी तातडीने वंचित बहुजन आघाडी प्रभाग १५५ (लालडोंगर, चेंबूर) चे समन्वयक स्वप्निल सुरेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. वाघमारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख जितरत्न पटाईत यांना माहिती दिली.
जितरत्न पटाईत यांनी तातडीने परभणी येथील पदाधिकारी संदीप खाडे यांच्याशी संपर्क साधला. खाडे यांनी अत्यंत कमी वेळात परभणीमध्ये जमदाडे यांच्या घराचा शोध घेतला आणि त्यांच्या नातेवाईकांशी स्वप्निल वाघमारे यांचा संपर्क करून दिला.
नातेवाईक मुंबईत येईपर्यंत जमदाडे यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय स्वप्निल वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग १५५ च्या कार्यालयात केली. आज, २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता विजय जमदाडे यांच्या पत्नी, मेहुणे सुनील अंभोरे आणि इतर नातेवाईक मुंबईत दाखल झाले. आपल्या हरवलेल्या व्यक्तीला सुखरूप पाहून नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
“एका हरवलेल्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे कार्य केले.” असे स्वप्निल सुरेश वाघमारे म्हणाले.
या यशस्वी मोहिमेत खालील व्यक्तींचे योगदान मोलाचे ठरले:
शकील शेख व हुसैन नूरबाश (लालडोंगर, चेंबूर), जितरत्न पटाईत (महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख, वंचित बहुजन आघाडी), संदीप खाडे (परभणी), स्वप्निल सुरेश वाघमारे (विभाग १५५, चेंबूर), प्रवीण पवार (लालडोंगर, चेंबूर).






