उस्मानाबाद : परंडा शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे सर्व नद्यांना मोठा पूर आला आहे. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने परंडा शहराचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे, सर्व वाहतूक थांबली असून नागरिक अडकून पडले आहेत.
धरणे ओव्हरफ्लो, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
तालुक्यातील सीना कोळेगाव, निन्म खैरी, इनगोंदा साठवण तलाव, खासापुरी प्रकल्प, साकत मध्यम प्रकल्प, आणि चांदणी धरण यांसारखी सर्व धरणे भरून वाहत आहेत. यामुळे, परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
चांदणी आणि उल्का नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. नरसाळे वस्तीवरील सहा लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, हिवरे वस्तीवर अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे जवान हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत.
पूरस्थितीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद झाले आहेत. शेळगाव येथील खैरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने करमाळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाटेफळ येथील नळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आनाळ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. याशिवाय, आवार पिंपरी येथील उल्का नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने कुईवाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. बार्शीकडे जाणारा रस्ताही सोनगिरी गावाजवळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि मदत कार्याला गती देण्यासाठी परंडा तहसील प्रशासनाने लष्कराची (Military Force) मदत मागवली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.