पनवेल : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पनवेल महानगर पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली असून आनंद गायकवाड यांची महानगराध्यक्षपदी निवड झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीची पहिली सर्वसाधारण सभा रायगड जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
या बैठकीत आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्यासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा झाली. महानगर क्षेत्रातील सर्व विभागांत संघटन बळकटीसाठी विभाग प्रमुख कार्यरत राहतील, असे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले. पनवेल ही रायगडमधील एकमेव महानगरपालिका असल्याने येथे वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरून २० प्रभागांत उमेदवार देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांनी स्पष्ट केले.
“पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडून पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन नवनियुक्त महानगराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, महानगराध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव अविनाश आडगळे, संतोष मुजमुले, उपाध्यक्ष कविता वाघमारे, छाया शिरसाठ, अमीना शेख, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, सतीश अहिरे, आलोक कांबळे, आशा लवांडे, सदस्य अब्दुल सलाम तसेच विविध विभाग प्रमुख आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.