पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपविण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात “विद्यार्थी आक्रोश आंदोलन” आयोजित करण्यात आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या परीक्षा व्यवस्थेचा निषेध नोंदविला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, NEET पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. परीक्षांमधील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी NTA रद्द करून UPSC सारख्या विश्वासार्ह संस्थेकडे सर्व परीक्षा सोपविणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनात मोठ्या संख्येने घोषणाबाजी करण्यात आले. तसेच या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





