कन्नड : वंचित बहुजन आघाडी (VBA) कन्नड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी आज केली. तसेच, कन्नड तालुक्यातील जवखेडा आणि शेलगाव येथील दोन उपसरपंचांसह आरपीआय (आठवले गट) च्या तालुका सचिवांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
कन्नड येथील हॉटेल आदर्श येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष गाडेकर बोलत होते.
नगरपरिषद आणि जि. प. निवडणूक ताकदीने लढणार
गाडेकर यांनी स्पष्ट केले की, कन्नड नगरपरिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले आहेत आणि लवकरच अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. नगरसेवक पदांसाठी प्रत्येक वॉर्डातून अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून, त्यांची छाननी प्रक्रियाही श्रेष्ठींकडून केली जाणार आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. कन्नड तालुक्यातील सर्व गट (जिल्हा परिषद) आणि गण (पंचायत समिती) च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे आणि पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली स्फोटप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकरांची ‘संघा’वर गंभीर शंका; ‘इंटर्नल’ स्फोटांची सखोल चौकशी करण्याची मागणी
प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
आजच्या बैठकीत अनेक प्रमुख व्यक्तींनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये कन्नड तालुक्यातील जवखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कचरू नरवडे, शेलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच युनुस पटेल, आणि आरपीआय (आठवले गट) चे कन्नड तालुका सचिव नाना जाधव यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत विक्की सातदिवे आणि सलीम पटेल यांनीही पक्षात प्रवेश केला. यावेळी विविध गट आणि गणांमधून इच्छुक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महासचिव प्रविण हिवाळे, जिल्हा सचिव उमेश सरदार, जिल्हा संघटक देविदास राठोड, लक्ष्मण धनेश्वर, रवी रत्नपारखे, साहेबराव चौतमल, सिध्दार्थ बनकर, नुरमोहम्मद भाई, महिला जिल्हाध्यक्षा कोमल हिवाळे, महिला तालुका अध्यक्षा विद्या दिवेकर, शालिनी बर्फे यांच्यासह शहर आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






