ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे : एक घटक तुम्ही कोणी लक्षात घेतला नाही. वसंत मोरे यांची एक जमेची बाजू आहे ती म्हणजे अजान आणि भोंग्याची. त्यामुळे मुस्लीम समाज पूर्णपणे वन साईड त्यांच्या बाजूने जाईल अशी परिस्थिती पुण्याची आहे, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकांत लाख ते दीड लाखांची लीड मिळत होती. त्याच्यातून ते जिंकत होते. 2014 मध्ये नवीन मतदार जो होता ज्याला मनमोहन सिंह यांच्या काळातील 2G घोटाळ्याचा राग आलेला, डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले म्हणून चीड आलेली. 2019 पर्यंत हा मतदार त्यांच्यासोबत राहिला. 2024 मध्ये हा मतदार त्यांच्याकडे आहे असे दिसत नाही. 70 टक्के होणारे मतदान आता 54-55 टक्क्यापर्यंत आलेले आहे. 10-12 टक्के मतदार मतदान करायला तयार नाही हा भाजपचा मतदार आहे. याचा परिणाम भाजपला भोगावा लागणार असल्याचे आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अकोल्यात काँग्रेसने नॉन मुस्लीम उमेदवार दिल्याने त्यांचा हिंदू मतदार पुन्हा काँग्रेसकडे आलेला दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतदान ट्रांसफर होत नाही असे दिसते. म्हणून शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार ट्रान्स्फर होत नाही म्हणून शिवसेना ( ठाकरे गट) हे मुस्लीम मतदारांकडे वळले आहेत. परंतु, मुस्लीम कार्यकर्ता त्यांना विचारत आहे की, विधानसभेत तुम्ही काँग्रेससोबत राहणार का? याचा खुलासा करा.
एकनाथ शिंदे विरुद्ध उध्दव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात दिसत आहे. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होताना दिसत आहे. जो धर्मनिरेपक्ष मतदार आहे मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो आमच्याकडे वळल्याचे दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले.
2014 साली आपल्या देशाचे GDP कर्ज हे 100 रुपयातले 24 रुपये एवढे होते. आज हे कर्ज 84 रुपयांवर गेले आहे. जागतिक बँक असे म्हणत आहे की, 2026 ला हे 96 रुपयांवर जाईल. म्हणजे शासनाला 100 रुपयातले फक्त 4 रुपये वापरायला मिळतील अशी परिस्थिती आहे. अशा पंतप्रधानाला आपण मान्य करायचे का ? असा सवाल आंबेडकर यांनी या वेळी उपस्थित केला.
कल्याण मतदार संघात वैशाली राणे यांना शिवसेना( ठाकरे ) यांच्याकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तो उमेदवार कमजोर आहे असे मानले जात आहे. मुस्लिम समाज त्या मतदासंघात जास्त आहे. जिथे मुख्यमंत्री आणि ठाकरे यांचे हाडवैर आहे तिथेच कमजोर उमेदवार देणे यावरूनच शंका निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी चौकशी सुरू नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे यांनी चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचायचे आहे. मला जेल मध्ये जायचे नाही असा टोला आंबेडकर यांनी या वेळी लगावला.