महापरिनिर्वाण दिनामुळे मेट्रोचे गेट बंद; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे मेट्रो प्रशासनाची माफी!
मुंबई : दादर मेट्रो स्टेशन (शिवसेना भवन शेजारी) येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ ते ७ डिसेंबरदरम्यान नेहमी प्रवाशांसाठी उपलब्ध असणारी दोन प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली. या संदर्भात मेट्रो प्रशासनाने लावलेल्या नोटीसमधील मजकूर आधुनिक तंत्रज्ञानातील जातीवादाचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त होत असून, या नोटीसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांचा अपमान झाला आहे.
मेट्रोचे गेट बंद असल्यामुळे हजारो आंबेडकरी अनुयायांना त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित लिफ्ट आणि गेटवर वाढलेली प्रचंड गर्दी पाहता जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी दादर मेट्रो स्थानकावर धडक देत मेट्रो अधिकाऱ्यांना नोटीसबाबत कठोर प्रश्न विचारले.
नोटीसवरील अपमानास्पद मजकूर लिहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने ही नोटीस अनवधानाने लागली असल्याचे सांगत जाहीर माफी मागितली तसेच लिखित स्वरूपात स्पष्टीकरणही दिले.
यावेळी राकेश बुवा कांबळे( मुंबई प्रदेश उपाध्यक्ष), आकाश अशोक दोडके (मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य), राज सावंत (वरळी तालुका समन्वयक), प्रणाली कांबळे (मुंबई प्रदेश महिला महासचिव), दिप्ती गोडबोले (मुंबई प्रदेश युवा महासचिव) तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.






