मुंबई : मुंबई विद्यापीठात पाली भाषेच्या स्वतंत्र विभागासाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या भंतेजींवर विद्यापीठातील माजोरड्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात काही भंतेजी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जखमी भन्तेजी यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा अध्यक्ष सागर गवई, महिला महासचिव सुप्रिया पवार, महिला सदस्य संगीता अब्दुले, युवा महासचिव मयूर आठवले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित, “भंतेजींवरील मारहाण हा लोकशाहीवर केलेला प्रहार आहे. पाली भाषेच्या स्वतंत्र विभागाची मागणी ही न्याय्य असून, या प्रश्नावर आम्ही ठामपणे भंतेजींसोबत आहोत,” असे स्पष्ट केले. पुढील कार्यवाहीसाठी वंचित बहुजन आघाडीने भंतेजींना पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.